शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील मैदानात पार पडला. यानंतर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त 'मोदी-शहा चालिसा'चे वाचनच" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे. 'मिंधे' गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात स्पष्टच सांगितले, ''मी मनात आणले असते तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिले नसते.'' ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती?" असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यावरून खोचक टोला लगावण्यात आला आहे. तसेच "लोकांचे डोके ठिकाणावर आहे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी विचारांचेच सीमोल्लंघन केले. 'बीकेसी'वर भोजनभाऊंची गर्दी झाली असेल तर तो खोकेवाल्यांचा प्रश्न! भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा 'ओकाऱ्या' काढाव्याच लागतात, नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे 'ईडी'कडून बडवले जाईल" असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
शिवसेनेचा ऐतिहासिक, पारंपरिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे त्याच उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शिवसैनिकांच्या निष्ठा आणि जनतेचे हे असे प्रेम हेच आमचे बळ. त्या बळावरच पाठीत खुपसलेले खंजीर पचवून आम्ही उभे आहोत. शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे; कारण सत्ता व पैसा या मुजोरपणावर शिवतीर्थ शिवसेनेस मिळू नये, दसरा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न झाले.
'मिंधे' गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात स्पष्टच सांगितले, ''मी मनात आणले असते तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिले नसते.'' ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती? आणि हे म्हणे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार! भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. शिवसेनेला शह वगैरे देण्यासाठी दुसरा दसरा मेळावा म्हणे 'बीकेसी'च्या मैदानात झाला.
मेळावा कसला? सध्या भारतीय जनता पक्षाने एक 'इव्हेन्ट' युग आपल्या देशात आणले आहे. त्यात जन्मापासून मयतापर्यंत उत्सव किंवा इव्हेन्टच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत 'इव्हेन्ट' दसऱ्याच्या निमित्ताने बीकेसी मैदानावर झाला. तेच, तेच आणि तेच रडगाणे याशिवाय तिथे दुसरे काय होते? नारायण राणे यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले.
भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा 'ओकाऱया' काढाव्याच लागतात, नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे 'ईडी'कडून बडवले जाईल. नाव शिवसेनेचे आणि मेळावा भाजपचा असाच थाट होता. कारण 'डुप्लिकेट' शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त 'मोदी-शहा चालिसा'चे वाचनच होते. 'माझ्यावर कसा अन्याय झाला आणि मीच कसा खरा' यापलीकडे बीकेसीवरील रडकथेत दुसरे काही सापडत नाही.
'मोदी मोदी आणि शहा शहा' अशा जेवढय़ा गर्जना भाजप मेळाव्यात होत नसतील तेवढय़ा 'डुप्लिकेट' सेनेच्या मुख्य नेत्यांच्या भाषणात होत होत्या. हे आक्रितच म्हणावे लागेल. 'एक दिल' आणि 'एक जान है हम' अशा आविर्भावात 'डुप्लिकेट' सेनेचे मुख्य नेते 'मा. मु.' साहेब बोलत होते. ते पाहून शिवसेनेने गाडलेल्या अनेक महाराष्ट्र दुश्मनांना आनंदच झाला असेल.
पुन्हा बीकेसीवर जी गर्दी जमवली गेली होती, त्या गर्दीत 'जान' तरी होती काय? ओढून-ताणून शेपटा बेंबटाला लावण्याचाच तो प्रकार होता. त्या गर्दीचेही 'ऑडिट' आता समोर येत आहे. दोनेक हजार एसटी गाडय़ा गर्दी मुंबईत आणण्यासाठी बुक झाल्या व त्याकामी 10 कोटी रुपये रोख भरण्यात आले. हे रोख 10 कोटी रुपये एसटी कर्मचारी तीनेक दिवस मोजत होते.
हे रोखीतले 10 कोटी मिंधे गटाच्या कोणत्या बँक खात्यातून आले? इतक्या कमी वेळात कोणी कोठे हात मारला? शिवाय दोन लाख लोकांना पंगत दिली गेली. बीकेसी मैदानामागे शाही जेवणाची पंगत असावी तसा सगळा लग्नथाट होता. येथे विचार-वारशाचा मेळावा(?) होता की 'हाऊ डू मिंधे', 'नमस्ते मिंधे'सारखा उत्सव होता, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. म्हणजे एकंदरीत या कार्यक्रमासाठी दोन आमदार विकत घेण्याइतका खर्च, म्हणजे पन्नास-शंभर खोके इतका झाला असावा! अर्थात यावर 'ईडी' वगैरेची नजर पडली नाही.
दसरा मेळाव्याच्या नावाखाली बीकेसीच्या मैदानावर एखादा 'फॅशन शो', 'सौंदर्य स्पर्धा' व्हावी तसा एक सोहळा झाला व त्यात कोटय़वधी रुपयांचा चुराडा महाराष्ट्राच्या कल्याणकारी 'मा.मु.' साहेबांनी केला तो फक्त एकाच कारणासाठी, ते म्हणजे 'मी म्हणजेच शिवसेना' ही खटपट सिद्ध करण्यासाठी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे 27 पानांचे प्रदीर्घ भाषण वाचून दाखवले. इतर वक्त्यांनी जी भाषणे केली ती म्हणजे निर्लज्जपणाचे टोक होते.
मिंधे गटाच्या मुख्य नेत्यांनी सांगितले की, 'आमच्या वाटेला जाऊ नका. आमच्या हातात सत्ता आहे. आम्ही काहीही करू शकतो. कोणत्याही थराला जाऊ शकतो. आमच्यावर टीका करणाऱ्यांचे आम्ही काय करतो? संजय राऊत आज कोठे आहेत?' स्वतःस कायद्याचे रक्षक म्हणवून घेणाऱया मुख्यमंत्र्यांचे हे विधान सगळय़ांना विचार करायला लावणारे आहे.
संजय राऊत हे शिवसेनेची भूमिका निष्ठाने व ठामपणे मांडत होते. त्यांची निष्ठा व भूमिका अडचणीची वाटू लागल्याने सत्ता व कायद्याचा गैरवापर करून राऊत यांना अटक करून तुरुंगात टाकले, हेच आता शिंदे यांनी कबूल केले. सत्ता डोक्यात जाते ती अशी. ती खूपच लवकर गेली, पण लोकांचे डोके ठिकाणावर आहे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी विचारांचेच सीमोल्लंघन केले. 'बीकेसी'वर भोजनभाऊंची गर्दी झाली असेल तर तो खोकेवाल्यांचा प्रश्न!
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"