शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "आतापर्यंत गुलाब पाहिलं, आता काटे पाहा" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांसह भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. तसेच "भाजपाचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत..." असंही म्हटलं आहे. "वंश विकत घेताहेत. जे मोठे केलेले सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले... आता काटे पाहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे...पुन्हा नवीन गुलाब फुलवीन" असं सांगत उद्धव यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"गेले महिनाभर मातोश्रीवर गर्दी आहे. आपली लढाई 2-3 पातळीवर सुरू आहे. रस्ता आणि कागदावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाही. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. वकील योग्य बाजू मांडत आहेत" असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घराणेशाहीमुळे शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष संपत जातील आणि एकटा भाजपा उरेल, असे विधान केले होते. नड्डा यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाच्या अध्यक्षांनी शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असं म्हटलंय. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आज मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून रोज लढाया सुरू आहेत. आपली लढाई दोन तीन पाळीवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे आणि तिसरी लढाई ही तेवढीच महत्वाची आहे. ती लढाई म्हणजे कागदाची. शपथपत्र गोळा करा. हा विषय खूप गंभीर आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, कायद्याची लढाई सुरू आहे. ती लढाई आपले वकील किल्ला लढवताहेत लढवताहेत. माझा न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे मी आधीच बोललो होतो की, हा प्रयत्न शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. परवा भाजपाच्या अध्यक्षांनी ते बोलून दाखवले. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणाले. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.