उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) देखील हल्लाबोल केला आहे. "ज्याला भविष्य माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार" असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत" असं ही म्हटलं आहे.
"बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे. संविधान दिन आहे. संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे."
"काही लोक 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे 40 रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? जो शेतकरी राबतोय तो आज विचारतोय मी खायचं काय? शिव्या खावून तुमचं पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"