मुंबई : धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि विकासक अदानी समूह यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 'धारावीचा पुनर्विकास करताना पहिल्यांदा नीट सर्वे झाला पाहिजे. दडपशाहीने सर्वे झाल्यास शिवसेना असा सर्वे हाणून पाडेल. शिवसेना आज प्रशासनात नाही. पण शिवसेनेची ताकद ही सरकारमध्ये असण्यात वा नसण्यात नसून शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे आणि सरकारला व अदानींना जाब विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे,' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. ते 'शिवालय' या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
धारावीचा पुनर्विकास हा लोकांच्या नाही तर गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "धारावीत आता जे लोक राहात आहेत, त्यांचं धारावीतच पुनर्वसन व्हावं, अशी आमची मागणी आहे. धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलं आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. धारावीला आज सोन्यापेक्षा जास्त भाव आला आहे, त्यामुळे आज सगळ्यांची नजर धारावीवर आहे. धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत, पण सोबतच गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथं घरं देण्यात यावीत. टीडीआरबाबतही गोंधळ आहे. इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यायला लागेल. मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करायला हवी. जसा बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे. अदानींचा विकास कसा होईल, याचा विचार या सगळ्यात गेला आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
"हे सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करत आहे. नियोजनशून्य कामामुळे मुंबईकरांचा जीव घुसमटत आहे. आजपर्यंत एवढं प्रदूषण कधीही पाहिलं नव्हतं. मुंबईतील इतरही तीन मोठे प्रकल्प यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. आम्हाला मुंबई कोणी आंदण म्हणून दिलेली नाही. त्यामुळे आम्हीही आमची मुंबई कोणाला आंदण म्हणून दिली जाऊ देणार नाही," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकार आणि अदानी उद्योगसमुहावर टीकास्त्र सोडलं आहे.