मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:08 PM2024-03-13T13:08:50+5:302024-03-13T13:11:47+5:30
मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप शिवतारेंनी अजितदादांवर केला.
पुरंदर - आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवतारे यांनी त्यांची मते जाणून घेतली. त्यात कार्यकर्त्यांनी एकमताने विजय शिवतारेंनीबारामती लोकसभा निवडणूक लढवावी असा ठराव करत तो मंजूर केला. त्यामुळे बारामतीच्या मैदानात विजय शिवतारे हेदेखील उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवतारेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीत अजित पवारांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. नमो विचार मंच यामाध्यमातून शिवतारे निवडणुकीत अपक्ष उभे राहणार आहेत.
याबाबत विजय शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. यावर मालकी कुणाची नाही. त्यामुळे पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागरूक करून लढलेच पाहिजे असा ठराव कार्यकर्त्यांनी केली. अजित पवारांनी २०१९ च्या निवडणुकीत खालची पातळी गाठली. मी लिलावती रुग्णालयात दाखल होतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं नाटकं करतोय, तू कसा निवडून येतो हे बघतोच असं अजित पवार म्हणाले होते. राजकारणात उर्मट भाषा त्यांनी केली होती. मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच बारामतीत पवार कुटुंबाविरोधात मतदान होते. साडेपाच लाख मतदार हे पवारविरोधक आहेत. त्यांना ना सुप्रिया सुळेंना मत द्यायचंय ना सुनेत्रा पवारांना, मग त्या मतदारांसाठी मी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदरची लोक बोलतायेत आम्हाला बदला घ्यायचाय. मी बोलत नाही. तो बदला नियतीने घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकशाहीला मानणाऱ्या लोकांसाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असं विजय शिवतारे यांनी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचे मालक केवळ पवार कुटुंबच ही मानसिकता मोडली पाहिजे. लोकांना फसवणे हा आमचा जन्मजात अधिकार आहे असं त्यांना वाटते. पवार कुटुंबाने पुरंदर, भोर, दौंड, इंदापूरला काय दिले, पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचे. पश्चिम भागातील २९ गावे जिथे आजही प्यायला पाणी नाही ते का दाखवले नाही. या लोकशाहीत कुणीतरी धाडस केले पाहिजे. लोकांची बाजू मांडून प्रस्थापितांविरोधात उभं राहिले पाहिजे असंही विजय शिवतारेंनी म्हटलं.
बारामतीत तिरंगी लढत होणार
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपाने अजित पवारांना आपल्यासोबत घेतले. त्यानंतर याठिकाणी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहणार हे निश्चित झाले आहे. मात्र त्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेत आता २०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्याची वेळ आहे असं म्हणत दंड थोपटले. २०१९ मध्ये विजय शिवतारे यांचा पराभव करण्यात अजित पवारांचा हात होता. तू कसा आमदार होतो बघतोच असं विधान अजित पवारांनी केले होते. ते प्रचंड गाजले. त्या निवडणुकीत शिवतारेंचा पराभव झाला होता. यंदा बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार होती. परंतु विजय शिवतारे यांनी आपणही या मतदारसंघात अपक्ष निवडणुकीला उभे राहणार असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आणि याचा फटका नेमका कुणाला बसणार हे पाहणे गरजेचे आहे.