उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याची चर्चा होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी धाव घेतली आहे. याबाबत, स्वत: एकनाथ शिंदेंनीही जाहीर सभेत सांगितलं होतं. आता, शिंदे गटातील आमदार आणि काय झाडी... काय डोंगार... काय हाटील डायलॉगफेम शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असंही पाटील म्हणाले. यावरून आता शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे.
"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena Vinayak Raut) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस. एकदा आपटी खाल्ली, पुन्हा शिवसेनेने आधार दिला म्हणून आमदार झाले. आता नशिबातली ही शेवटची आमदारकी आहे. पांडुरंगाच्या पंढरीमध्ये राहून सुद्धा संत तुकारामही त्यांना कळले नाही. शहाजीबापूंनी गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. त्यामुळे, यापुढील निवडणुकांवर आमच्याकडून उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवर लावला जाणार नाही, एकनाथ शिंदेंचा लावला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सुरू असलेल्या सभा आणि त्यांच्या भाषणावर बोलतानाही त्यांनी आदित्य यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.
संजय राऊत दोषी असतील म्हणून त्यांना अटक झाली असावी. ईडीचा कुठलाही दोष नाही. त्यांना अटक केली त्यांचा आर्थिक व्यवहार पुढे येतील. आज महाराष्ट्र किरकिऱ्या कारट्याकडून शांत झाला असेल. उद्धव ठाकरेंनी हा आवाज बंद केला नाही तो ईडीने केला. ७-८ वर्ष त्यांचे दर्शन होत नाही आता निवांत राहा. शांत राहा अशा शब्दात शहाजीबापू पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.