मुंबई - शिवसेना आणि शिंदे गटाच्या (Shivsena vs Eknath Shinde) वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सत्तासंघर्षाचे प्रकरण आता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही (Election Commission) दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला होता. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्याने शिवसेनाउद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता शिंदे गटातील आमदाराने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि पुन्हा आम्हीच आमदार होऊ असं सांगत भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. याचा निर्णय व्हायला चार ते पाच वर्ष लागतील असे संकेत गोगावले यांनी दिले आहेत. तसेच शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल असा मोठा दावाही भरत गोगावले यांनी केला आहे.
"निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ"
"अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी आजच सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, सात तारखेला धनुष्य़बाण निशाणीची तारीख आहे ती पण आम्ही घेतो, तेही तुम्हाला आज सांगतो" असं भरत गोगावले यांनी एका सभेत म्हटलं आहे.
शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याआधीही उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत मागितली होती, पण निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात म्हणजेच 23 ऑगस्टला कागदपत्रं सादर करण्याचे आदेश ठाकरेंना दिले होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आपणास कागदोपत्रे सादर करण्यास 4आठवडे मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण असून आम्हाला तोपर्यंत 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी, असे शिवसेनेनं आयोगाकडे दिलेल्या पत्रात म्हटले होते. आता, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली असून 4आठवड्यांचा अवधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे.