योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - भारतीय जनता पार्टीशी महापालिका निवडणुकीसाठी युती करणार नाही, या उद्धव ठाकरेंच्या घोषणेमुळे शिवसेना मनसे युती होईल का यावर राज्यभरात चर्चा झडायला लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीसच शिवसेना व मनसेच्या युतीच्या चर्चा झडल्या होत्या. शिवसेना मनसेने पुढे केलेल्या हातावर टाळी देतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याआधी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून शिवसेनेने आत्तापर्यंतचे सर्वाधिक आमदार निवडून आणले.
त्यामुळे भाजपाची साथ नसेल तरी शिवसेना चांगली कामगिरी करू शकते असा विश्वास उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना वाटत आहे. तर आता शिवसेना भाजपासोबत जाणार नसल्याने मनसेबरोबर युती करेल अशी आशा अनेकांना लागली आहे. राज ठाकरे यांचा तरुणांमध्ये असलेला करीश्मा आणि उद्धव ठाकरे व शिवसेना यांचं कानाकोपऱ्यात असलेलं नेटवर्क यांचा संगम झाला तर ही युती भाजपाला भारी पडू शकते असा तज्ज्ञांचा होरा आहे. शिवसेना व मनसे वेगळे लढले तर मराठी मतांचं विभाजन होतं आणि याचा फायदा विरोधकांना होतो, हे याधी दिसून आलेलं आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर अशी विभागणी शिवसेना व मनसे दोघांनाही परवडणारी नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार शिवसेना व मनसेमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक अशा चार महापालिकांसाठी युती होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मनसेला किमान 50 जागा मिळाव्यात अशी मागणी असल्याचे समजते.
भाजपा स्वबळावर लढत असताना शिवसेना व मनसेची युती झाली तर महापलिकांच्या निवडणुका कमालीच्या रंजक होतील यात काही शंका नाही. ही युती होते का, हे लवकरच स्पष्ट होईल.
आणखी वाचा