मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी रविवारी शिवसेनेने आपल्या तिसऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना एबी फॉर्म प्रदान केला़विप्लव बाजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव आहेत. शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून आमचाच उमेदवार जिंकेल, स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे.‘एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम राहत शिवसेनेने यापूर्वीच नाशिक मतदारसंघातून नरेंद्र दराडे तर कोकणातून राजीव साबळे यांच्या नावांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार असून २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.परभणी, हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतून भाजपाकडे अपुरे संख्याबळ आहे. त्यामुळेच आपला स्वतंत्र उमेदवार उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या होत्या. यासाठी वाशिम-बुलडाणा-अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करणाºया गोपीकिशन बाजोरिया यांची या मतदारसंघात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बाजोरिया यांच्या निमित्ताने शिवसेनेने आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार मैदानात उतरविला आहे.
विप्लव बाजोरियांना शिवसेनेची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:44 AM