नाशिक : उमेदवारांकडून एबी फॉर्मच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या या कारनाम्याविरुद्ध आता कॉँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता सदर चित्रफितीवरून सेना-भाजपातही राजकीय फड रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने तिकीट देताना उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याची व्हिडीओ क्लीप सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सदर व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कॉँग्रेसने त्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आयोगाच्या पथकाने चौकशी करत भाजपाच्या सर्व ११९ उमेदवारांना नोटिसा बजावतानाच शहराध्यक्षांकडूनही खुलासा मागविला आहे. चित्रफितीचे प्रकरण चौकशीच्या स्तरावर असतानाच आता या वादात भाजपाविरुद्ध शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चासाठी स्वतंत्र बॅँक खाते उघडण्याचे बंधनकारक केले आहे. त्या खात्यात पैसे जमा करून खर्चाचा तपशील आयोगाला सादर करायचा आहे. असे असताना भाजपाने उमेदवारांकडून प्रचारासाठी खर्च म्हणून २ लाख रुपयांची मागणी केलेली आहे. सदर प्रकार हा आचारसंहितेचा भंग असल्याचे करंजकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणीही करंजकर यांनी केली आहे.
शिवसेनेची भाजपाविरुद्ध तक्रार
By admin | Published: February 15, 2017 8:06 PM