ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदार यादीमधील घोळाप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचं समोर आल्यानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. ‘11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते’ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
शिवसेना भवनात टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये येणा-या तक्रारी शिवसेनेकडून न्यायालयात सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
एल वॉर्डमधील चुनाभट्टी येथील प्रभाग क्रमांक १७१ मध्ये स्वदेशी मराठी शाळा मतदान केंद्रात झालेल्या मतदार याद्यांच्या घोळाने मतदारांच्या नाकीनऊ आले. प्रभाग क्रमांक १६६ मध्येही मतदार याद्यांचा घोळ काही प्रमाणात दिसून आला. येथील महापालिका शाळेत दाखल झालेल्या मतदारांना मतदान केंद्रातील बुथ क्रमांकाबाबत चुकीची माहिती मिळाल्याने संबंधितांचा वेळ रांगेत गेला.
वांद्रे पूर्वेला सरकारी वसाहत, गांधीनगर, एमआयजी कॉलनी, शास्त्रीनगर परिसर असणाऱ्या या भागातही याद्यांचा गोंधळ दिसत होता. महात्मा गांधी शाळेत मतदान बजावण्यासाठी येणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नावेच गायब होती. प्रभाग क्रमांक ८७, ९0, ९२, ९४, ९५, ९६ मध्येही मतदानावेळी गोंधळ दिसून आला. पश्चिम उपनगरातही अंधेरीपासून बोरीवलीपर्यंतच्या मतदारांना मतदार यादीत नावे शोधताना कसरती कराव्या लागत होत्या. राजकीय पक्षांनी उभारलेल्या बुथवरही मतदारांची नावे शोधताना कार्यकर्त्यांची दमछाक होत होती. पूर्व उपनगरात राजकीय बुथवरील कार्यकर्त्यांनी मतदारांना ज्या मतदान केंद्रात जाण्याबाबत मार्गदर्शन केले, त्याबाबतही काहीसा गोंधळ उडाला होता.