सदानंद नाईक/उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सदस्य निधीतून बोटक्लब विकसित करा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. उल्हासनगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष प्रल्हाद अडवाणी यांनी सन 1985 ते 89 दरम्यान वालधुनी नदीकिनारी हिराघाट येथे बोटक्लब उद्यान विकसित केले.
तलावातील बोटीमध्ये बसण्यासाठी व उद्यानात मुले, महिला, वृद्ध आधीची गर्दी झाली. कालांतराने बोटक्लब कडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने, बोटक्लब बंद पडले. मध्यंतरी बोटक्लब बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र सामाजिक संस्थेच्या विरोधामुळे बीओटीचा प्रस्ताव बारगाळला. बोटक्लबच्या साफसफाई व देखभालीसाठी तब्बल 27 वर्षे नागरिकांना वाट पहावी लागली. बोटक्लब कचऱ्याचे डम्पिंग होउन, महापुरुषांचे शिल्पे कचऱ्या खाली दडली गेली.
तसेच बोटक्लबचा ताबा कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने घेतला असून कचऱ्याच्या गाड्या पार्किंग केल्या आहेत. कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांनी आवाज उठविल्यावर महापालिका, राजकीय नये, नगरसेवक, सामाजिक संस्था यांना जाग येऊन, सर्वजण कामाला लागले. उद्यानाचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम हाती घेऊन प्रजासत्ताक दिनी भारत मातेच्या शिल्पाची पूजा थाटामाटात साजरी झाली. कधी नव्हे महापालिके कडून साफसफाई अभियान राबविण्यात आले.
स्थायी समिती सदस्य निधीतून विकास
महापालिका स्थायी समिती सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधीची तरतूद आहे. या निधीतील 25 टक्के रक्कमेतून बोटक्लब उद्यान विकसित करण्याची मागणी चौधरी यांनी केली.
खासदार शिंदे यांच्याकडे साकडे
खासदार श्रीकांत शिंदे याच्या खासदार निधीतून बोटक्लब विकसित करण्यासाठी, शिवसेनेच्या वतीने साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. याकरीता पत्रव्यवहार सुरू केल्याचे त्यांनी म्हटले.