क-हाड (जि. सातारा) : ‘मी पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करतोय; पण सत्तेत राहायचे आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करत बोलायचे, असे मी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले, ‘शेतकºयांच्या कर्जमाफीवर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे विधान यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते; पण काय करणार ते आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत. त्यामुळे जास्त काय बोलणार? शेतकºयांच्या कर्जमाफीला छत्रपती शिवरायांचे नाव देऊन शेतकºयांचाच नव्हे तर शिवरायांचाही यांनी अवमान केला आहे. सत्तेत येतानाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव वापरले. मात्र, शिवरायांचे स्वराज्य कुठे आणि यांचे सरकार कुठे, हे जनतेला कळू लागले आहे.’हा तर वर्षातील सर्वात मोठा विनोद...‘यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे,’ या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर ‘हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे,’ अशी टिप्पणी पवारांनी केली.मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे पाय सत्तेच्या ‘फेव्हिकॉल’मध्ये अडकलेत, शरद पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:59 AM