नाशिक : मंत्र्यांची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र, पथनाट्याच्या माध्यमातून सरकारवर आसूड व लक्षवेधी घोषणांचे फलक हातात घेऊन शनिवारी जिल्हा शिवसेनेने भाजपा मंत्र्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संतापाला वाट मोकळी करून दिली. नाशिककरांचे हक्काचे पाणी पळविणाऱ्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आगामी काळात भाजपा हाच आपला राजकीय शत्रू राहणार असल्यावर सेनेने शिक्कामोर्तब केले. नाशिकचे पाणी जायकवाडीला देण्यात आले तेव्हापासून येथे शिवसेना आणि भाजपात संघर्ष सुरू झाला आहे. नाशिकच्या नार-पार नद्यांचे पाणी गुजरातला देण्यात येणार असून, पाण्याच्या विषयांबरोबरच आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करण्याची चर्चा, एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्राचा नवा संच विदर्भात स्थलांतरित करणे, राज्य सरकारचे टीडीआर धोरण आदींबाबत भाजपाच्या मंत्र्यांना लक्ष्य करीत हा मोर्चा काढण्यात आला. त्यात शिवसेनेचे संपर्क नेते आ. अजय चौधरी, खा. हेमंत गोडसे, उपनेते बबन घोलप, आ. राजाभाऊ वाजे, आ. अनिल कदम, आ. योगेश घोलप आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
भाजपा मंत्र्यांविरुद्ध शिवसेनेचा मोर्चा
By admin | Published: March 20, 2016 2:23 AM