नागपूर: महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भावरून केलेल्या विधानावरून मंगळवारी शिवसेनेने अणे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला खरा पण अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावर सरकारने निवेदन करावे असे सांगत तो प्रस्ताव फेटाळला. मात्र विषयावरून शिवसेनेने केलेला विरोध लटकाच ठरला.प्रश्नोत्तराचा तास संपताच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग मांडला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याचा किंवा त्यासंबंधी भाष्य करण्याचा अधिकार महाधिवक्ता पदावर असणाऱ्या व्यक्तीला असत नाही. त्या व्यक्तीचे मत म्हणजे सरकारचे मत असते. अणे यांनी व्यक्तिगत कोणतीही भूमिका मांडावी त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यांनी ज्या पदावरून ही भूमिका मांडली त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा अपमान झाला आहे त्यामुळे आम्ही अणे यांच्या विरोधात हक्कभंग आणत आहोत असेही सरनाईक म्हणाले. विशेष म्हणजे त्यावेळी सभागृहात शिवसेनेचे मंत्री हजर नव्हते. सरनाईक यांचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला व सरकारने यावर निवेदन करावे असे निर्देश दिले. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार हातात फलक घेऊन अध्यक्षांच्या आसनाकडे निघाले. मात्र वेगाने मुख्यमंत्री उभे राहात सरकार या विषयावर निवेदन करेल असे जाहीर करून टाकले. त्याक्षणी शिवसेनेच्या आमदारांनी यू टर्न घेत आपले आंदोलन म्यान केले. लगेच सगळे आमदार सभागृहाबाहेर माध्यमांपुढे गेले आणि तेथे अखंड महाराष्ट्र जिंदाबाद, अणे यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत उभे राहिले.मुख्यमंत्री निवेदन कधी करणार? अधिवेशन संपण्याच्या आत करणार का? असा कोणताही प्रश्न या विषयावर आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेला पडला नाही. सरनाईक हक्कभंग मांडत असताना विरोधी बाकावरील आणि भाजपाचे सदस्य शांत बसून होते तर शिवसेनेचे सदस्य बाके वाजवून सरनाईक यांचे कौतुक करीत होते. मात्र हक्कभंग फेटाळत आहे असे अध्यक्षांनी जाहीर करताच भाजपा सदस्यांनी अध्यक्षांच्या भूमिकेचे बाके वाजवून अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा लटका विरोध!
By admin | Published: December 16, 2015 3:18 AM