ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 4 - महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची यंदाची टर्म भाजपाची असताना शिवसेना आपलाही उमेदवार निवडणुकीत उभा करणार आहे. यासाठी शिवसेनेच्या शीतल मंढारी यांनी केडीएमसीच्या महिला बालकल्याण सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखलदेखील केला आहे. भाजपाही स्वतंत्रपणे अर्ज दाखल करणार आहे.
शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात असून पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी विकासकामांच्या प्रस्तावांना स्थगिती दिल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आता यापुढे स्वबळावर लढण्याचा पवित्रा शिवसेनेनं बोलून दाखवला आहे.
त्यामुळे मुंबई, ठाणेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील युतीही धोक्यात आली आहे. येऊ घातलेल्या महिला बालकल्याण सभापतींसह परिवहन सभापती आणि उपमहापौर निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती महापालिकेतील शिवसेना पक्षाचे गटनेते रमेश जाधव यांनी दिली.
बहुमतासाठी प्रसंगी अन्य पक्षांची मदत घेऊ, असेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.