उल्हासनगर : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शिवसेनेने प्रभागनिहाय मेळावे सुरू केल्याने त्यातून पक्षाचे एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच सुरू असल्याचे दिसून येते. महापौर भाजपाचाच असेल, या कुमार आयलानी यांच्या वक्तव्यानंतर आणि भाजपाने शिवसेनेला बाजूला ठेवून रिपाइंशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे. या मेळाव्यातून शिवसेनेने सर्वच प्रभागात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असले, तरी नेत्यांची भाषा तूर्त युतीचीच आहे. प्रभाग १, २ तसेच ५, ६, ७ व ११, १२ येथे १६ जानेवारीला, प्रभाग १३, १७, १८ व १९ मध्ये १७ जानेवारीला, १८ व २१ जानेवारीला प्रभाग १४, १५, १६, २० आणि ३, ४, ५ व ९, १० या प्रभागात हे मेळावे होतील, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.महापालिका निवडणुकीत शिवसेनेची भाजपासोबत युती झाली नाही, तर रिपाइंतील कवाडे, गवई तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपासोबत युती करण्याचे संकेत त्यांनी दिले. ओमी कालानी टीम व भाजपाला मराठी पट्टयातून हद्दपार करण्याचा मानस शिवसेनेने व्यक्त केला असून रिपाइंच्या गटासोबत शिवसेनेच्या निवडून येण्याची व्यूहरचना तयार केली आहे. मराठीसोबतच सिंधी परिसरातील प्रभागातही सेनेने मेळाव्यांचे नियोजन केल्याने भाजपासह ओमी टीममध्ये अस्वस्थता आहे. या मेळाव्यांना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आ. बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर मार्गदर्शन करतील.(प्रतिनिधी)>‘सारेच दोषी’गेल्या दहा वर्षांत उल्हासनगरचा विकास झाला नाही, असा आरोप होत असेल, तर एक लक्षात घ्या... या सत्तेत सेनेसह भाजपा, साई, रिपाइं, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगगरसेवकही सत्तेत होते. त्यामुळे तेदेखील तितकेच जबाबदार असल्याचा टोला चौधरी यांनी लगावला. साई पक्षाला दोनदा महापौरपद मिळाले. उपमहापौर व स्थायीचे सभापतीपद अनेकदा भाजपकडे होते. रिपाइंकडे उपमहापौरपद आहे. अपक्ष नगरसेवकांनी विविध समित्यांचे सभापतीपद भूषविले, याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेविका जया साधवानी, मीना सोंडे, राजेश वधारिया व मनसेचे रवींद्र दवणे यांनाही सेनेने सत्तेत सहभागी करून विविध समित्यांची सभापतीपदे दिली. त्यामुळे कोणालाही महायुतीच्या सत्तेविरोधात बोलण्यास जागा नाही. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीनेच वेळोवेळी आवाज न उठविल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन सुरू
By admin | Published: January 16, 2017 4:00 AM