मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - 2014 साली विधानसभा निवडणुकीतील पराभूत जागांवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले असताना 2019 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेनेने आतापासूनच सुरु केली आहे. अंधेरी(प)विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख सुनील दळवी यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते आणि खासदार विनायक राऊत,भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले.अंधेरी(प)डी.एनं.नगर येथील भाई भगत मार्गावरील महापालिका शाळेसमोर हे जनसंपर्क कार्यालय उघडले आहे.
आपल्या भाषणात खासदार कीर्तिकर म्हणाले की,सुनील दळवी यांनी याभागात तळागळात काम केले असून त्यांनी येथे शिवसेना बांधली आहे .त्यामुळे जर येथून त्यांना विधानसभेचे तिकीट दिल्यास दळवी येथून सीट काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संदर्भात दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,माझे डी एन नगर मेट्रो स्थानकानजिक इंडियन ऑइल सोसायटीतील कार्यालय हें छोटे होते,त्यामुळे या नवीन जागेत सदर नवीन जनसंपर्क कार्यालय उघडले आहे.विधानसभा अजून दूर असून तिकीटाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील,मात्र सध्या भाजपाकडे असलेली येथील आमदारकीची सीट शिवसेनेकडे कशी येईल यासाठी आमदार -विभागप्रमुख डॉ अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांनी आणि येथील शिवसैनिकांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी अात्तापासूनच सुरु केल्याचे सूतोवाच त्यांनी केले.