मुंबई : केडीएमसी निवडणुकीत हिंदुत्ववादी मते मिळविण्यासाठी शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्ड पुढे केले आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव वापरण्याचा डाव आखला आहे. भाजपासोबत युती होणार नाही हे लक्षात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू करून शिवसेनेने संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी मते आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे. अंदमान येथील सावरकर यांच्या काव्यपंक्ती पुन्हा बसवण्याचा कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने झाला. सावरकर यांना भारतरत्न दिले पाहिजे, असा आग्रह सातत्याने शिवसेनेने धरलेला आहे. मनसेने विकासाच्या मुद्द्याऐवजी भावनेला हात घालण्याचे ठरवले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यास झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पुरंदरे यांची प्रकट मुलाखत डोंबिवलीत घेण्याचा कार्यक्रम मनसे आयोजित करणार आहे. शिवसेना व मनसेचा प्रयत्न हा मुख्यत्वे सावरकर व पुरंदरे कार्ड खेळून भाजपाकडील हिंदुत्ववादी मतपेटी फोडणे हा आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळीच कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असल्याने देशात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. गोवंश हत्याबंदी, उत्तर प्रदेशात गोमांस खाण्यावरून झालेली हत्या यांसारख्या मुद्द्यांवरून एकीकडे एमआयएम तर दुसरीकडे भाजपा यांच्यात अनुक्रमे मुस्लीम व हिंदू मतांचे ध्रुवीकरण व्हावे असा त्या पक्षाचा प्रयत्न आहे. सनातनवर बंदी घातली तर एमआयएमवरही बंदी घालावी लागेल हे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे विधान हेही त्याच व्यापक राजकीय खेळीचा हिस्सा मानला जात आहे. दरम्यान, सर्वच प्रमुख पक्ष भावनिक कार्ड फेकण्याच्या बेतात असल्याने नागरी प्रश्नांची चर्चा बेताचीच होईल, असे संकेत प्राप्त होत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेचे सावरकर तर मनसेचे पुरंदरे!
By admin | Published: October 05, 2015 2:32 AM