ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सध्या सामनामध्ये मॅरेथॉन मुलाखत सुरु आहे. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेने कामाचे डोंगर उभे केले आहेत. त्या बळावरच आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. ज्यांना शिवसेनेचे काम दिसत नाही त्यांच्या मेंदूत खड्डे पडलेत.
23 तारखेला ते भरले जातील असेही उद्धव यांनी म्हटले आहे. शिवसेनेने मुंबईच्या वैभवात आणि नागरी सुविधांत भर टाकणारी उत्तम कामे करुन दाखवली असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या विरोधकांना त्यांनी देशातील एका तरी महापालिकेने इतके प्रचंड काम केले आहे काय? असा खडा सवाल विचारला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधील काही महत्वाचे मुद्दे
- भगवा हीच मुंबईची ताकद आहे. शिवरायांचा हा भगवा आहे. नुसते पोस्टर आणि होर्डिंग्जवर शिवरायांचे फोटो छापून शिवरायांवरील प्रेम व्यक्त होणार नाही. शिवरायांच्या विचारांचे काय? तो विचार भगव्यात आहे आणि भगवा आमच्या खांद्यावर आहे. खरा भगवा.
- प्रत्येक क्षेत्रातच शिवसेनेने कामांचे डोंगर उभे केले आहेत. मग आरोग्य घ्या. तुम्ही बघा, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य सेवा आहे. ज्याला आपण ट्रिटमेंट म्हणतो ही सर्वोत्तम आरोग्य सेवेपैकी एक आहे, असं मी म्हणेन. नक्कीच आहे. त्यानंतर महापालिकेने उभारलेली नवी हॉस्पिटले, जुन्या हॉस्पिटलचं नूतनीकरण, त्यातले उपचार; मग लिव्हर ट्रान्सप्लाण्ट असेल, शिवाय तुम्ही जाऊन कॅथलॅब पाहा. ती खरंच बघण्यासारखी आहे. ट्रॉमा केअर सेंटर केलं आहे. ते पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर गोरगरीबांना डायलेसिस सेंटर्स वाजवी दरात उपलब्ध करून दिली. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे.
- शिक्षण क्षेत्रात तर मी अभिमानाने सांगेन. दोन गोष्टी तर अशा आहेत की, त्या करणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे असं मी शंभर टक्के सांगेन. पहिली म्हणजे व्हर्च्युअल सिस्टीम. त्या व्हर्च्युअल सिस्टीमसाठी अमिताभ बच्चन आले होते. माधुरी दीक्षितही आल्या होत्या. रघुनाथ माशेलकरही आले होते. अमिताभ बच्चन दुसऱया टप्प्याच्या वेळी आले होते. सगळे जण बघून थक्क झाले. अमिताभजी तर म्हणाले, ‘ये सब आप लोगों को बताते क्यूं नही.’ व्हर्च्युअल सिस्टीम म्हणजे महापालिकेतल्या शिक्षकांपैकी काही चांगल्या शिक्षकांची निवड करून एका स्टुडिओतून ४०० शाळांतील दहावीच्या वर्गांना शिकवले जाते आणि ते शिकवलं जातं म्हणजे नुसते टीव्ही लावण्यासारखं नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रश्नोत्तरं होऊ शकतात…लाईव्ह.
- खड्डेमुक्त मुंबईपेक्षा आधी त्यांचा कारभार खड्डेमुक्त करा. आता तसे खड्डे कुठे आहेत? मी समर्थन करत नाही, पण एक मान्य करतो की, पावसाळय़ात खड्डे पडतात. काही ठिकाणी खड्डे पडतात. पण ते खड्डे तसेच आम्ही सोडून देत नाही. ते खड्डे तातडीने बुजवले जातात. यात आणखी एक गोष्ट सगळय़ांना माहीत असायला पाहिजे की मुंबईचे रस्ते महापालिकेच्या अखत्यारीतील किती आहेत? मुंबई महापालिका मेंटेनन्स करत असलेले रस्ते किती आहेत? एमएमआरडीए, एमएमआरडीसी वगैरे वगैरे ज्या इतर संस्था आहेत त्यांच्या अखत्यारीतले रस्ते किती आहेत? विशेष म्हणजे हा आपला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग हे दोन्ही राज्य सरकारकडे आहेत. ते आपल्या ताब्यात नसतात. सगळय़ात जास्त खड्डे हे त्यावर पडले आहेत आणि पडतात.
- बॉस म्हणाल तर मी आहे. नक्कीच आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हटल्यानंतर मी बॉस आहेच. आणि आज एका बलाढय़ संघटनेचा ‘प्रमुख’ असल्यावर त्यांनाही मला ‘बॉस’ मानावंच लागेल. पण हे आरोप करणारे लोक आहेत त्यांना इथे कवडीचीही किंमत नाही हेच त्यांचे दुःख आहे.
- शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या बाबतीत मी म्हणेन, या दोन जागांच्या तुलनेत ही जागा तशी खूप लहान आहे. परंतु जागा ज्यावेळी ठरविण्यात आली त्याबाबत मी आधीच माझी भूमिका मांडली होती. तीच पुन्हा मांडतोय की, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी मी कोणापुढेही हात पसरणार नाही. त्याप्रमाणे याही मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की मी हात पसरणार नाही. पण त्यांनी पुढाकार घेतला आणि मग जागा कुठे? असा प्रश्न आला. म्हटलं, जागा करायचीच असेल तर महापौर बंगला ही जागा योग्य आहे. याचं कारण शिवसेनेचा जन्म साधारणतः शिवाजी पार्क, लालबाग, परळ या परिसरातच झाला. इथेच शिवसेनेच्या शाखा आधी सुरू झाल्या. इथून शिवसेना फोफावली, वाढली. शिवसेनाप्रमुखांनी जो इतिहास घडवला तो शिवतीर्थावरून. त्या शिवतीर्थाच्या बाजूला सावरकर स्मारक आहे. दुसरं, आम्ही जे केलं होतं ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचं दालन. ही दोन महत्त्वाची स्मारकं तिकडे असल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी मला तीच एक जागा योग्य वाटली महापौर बंगल्याची. याचं कारण असं, या महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या तसेच बाकीही राजकीय नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत. ज्या ज्यावेळी शिवतीर्थावर युतीची सभा व्हायची तेव्हा अटलजी पंतप्रधान असताना आधी महापौर बंगल्यावरच यायचे. शिवसेनाप्रमुख आणि ते तिथून शिवतीर्थावर जायचे. आडवाणी यायचे. या जागेशी शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचा एक संबंध जोडला गेला.