मुंबई : एसटी महामंडळाकडून नुकत्याच शिवशाही बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांच्या सेवेत शिवशाही बसेस आणल्यानंतर त्याचे भाडे शिवनेरीपेक्षाही कमी असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश शिवशाहीत आहे. यातील एका बसच्या उद्घाटनाचा शुभारंभ नुकताच एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात करण्यात आला. अशा ५00 बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिह देओल यांनी सांगितले की, यातील जास्तीत जास्त बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतील, तसेच रात्रीच्या वेळेतच सर्वाधिक बसेस चालविण्याचा विचार केला जात आहे. व्होल्वो बसची किंमत आणि भाड्याने येणाऱ्या शिवशाही बस याचे आर्थिक गणितही पाहता, भाडे कमी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिवशाही बसचे भाडे शिवनेरीपेक्षाही कमी
By admin | Published: February 10, 2016 1:08 AM