ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 24 - शहरातील शिवाजी चौकातील मल्टी पर्पज शाळेची साडेपाच एकर शासनाची जागा नगर परिषदेने हस्तांतरीत करून भव्य क्रीडांगण उभारले आहे. शिवाय, क्रीडांगणालगतच शिवसृष्टीच्या माध्यमातून शिवशाहीचे दर्शन घडविले जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट अनुभवता येणार आहे. नगरपालिकेचे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कल्पनेतून याची निर्मिती झाली असून शहराच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे.
नगर परिषदेच्या पुढाकाराने शहरात शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे दर्शन घडविले जात आहे. शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. या शिवसृष्टीत शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते आरमार उभारणीपर्यंतची चित्रे साकारण्यात आली आहे. शहराच्या ऐन मध्यभागी ही सृष्टी उभारल्याने नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यामुळे बीड शहराच्या वैभवात भर पडली तर आहे, शिवाय राष्टÑीय महामार्गावरील हा शिवाजी चौक परिसर स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचेही आकर्षण स्थळ बनले आहे. भविष्यात मल्टीपर्पज मैदानावर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महराज, वीर जिवाजी महाले या महापुरूषांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. शिवसृष्टी-भीमसृष्टीमुळे महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
असे आहे शिवसृष्टीचे स्वरूप-
शिवाजी चौकातील शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आहेत. शिवजन्म, त्यांची जडणघडण, स्वराज्याची शपथ, बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील लढा, आग्ºयाहून सुटका, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पराक्रम, आरमाराची उभारणी, रायगडावरील राज्याभिषेक आधारित चित्राच्या माध्यमातून देखावे सदर केले जाणार आहेत. याशिवाय शिवसृष्टीच्या दोन्ही बाजूने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
यासंदर्भात आॅनलाईन लोकमतशी बोलताना डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, शहराच्या वैभवात भर टाकणारे हे मल्टी पर्पज क्रींडागण औरंगाबादनंतर बीडमध्ये उभारले आहे. खेळाडूंना याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. यासोबतच शिवसृष्टी-भीमसृष्टीची निर्मिती करून नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना ऐतिहासिक प्रेरक प्रसंगाचे अनोखे दर्शन घडणार आहे. चांगल्या कामाच्या उभारणीत नेहमीच विरोधकांनी खोडा घालण्याचे काम केले आहे. परंतु अशा विरोधाला न जुमानता शहराच्या विकासासाठी जे-जे सर्वोत्तम करता येईल, ते आजवर केले आहे.