मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात होणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होणार आहेत.राज्यातील पूर परिस्थितीमुळे नाशिक जिल्हयात बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती. आता पूरस्थिती निवळत असल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने जाहीर केलेली महापर्दाफाश यात्रा मात्र पुढे ढकलण्यात आली आहे. २० आॅगस्टपासून मोझरी येथून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत विशेष कार्यक्रम होणार आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते त्यासाठी दिल्लीत असतील. त्यामुळे यात्रा पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार २५ आॅगस्टला अमरावती येथून ही पोलखोल यात्रा निघेल.
आजपासून राष्ट्रवादीची पुन्हा ‘शिवस्वराज्य यात्रा’; काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा मात्र लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:12 AM