ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर उपचारास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणूक मतदानावेळी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. शोभा डे यांनी उडवलेली खिल्ली मात्र जोगावत यांच्यासाठी फायद्याचं ठरलं असं म्हणावं लागेल.
दौलतराम जोगावत आता वजन घटविणार असून सोमवारी चर्नी रोडवरील सैफी रुग्णालयात ते दाखल झाले. दौलतराम यांचे वजन सध्या १८० किलो इतके आहे. जोगावत यांच्या वैद्यकीय चाचण्यांनंतर प्रसिद्ध बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला सर्जरी करायची की वजन घटवण्यासाठी दुसरा मार्ग निवडायचा यासंबंधी निर्णय घेतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
शोभा डे यांनी ट्विटर करत माझ्या ट्विटमुळे फायदा झाल्याचा आनंद सांगत पोलिसांनी फिटनेस गंभीरपणे घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
Madhya Pradesh Police inspector Daulatram Jogawat, who was fat-shamed on Twitter is undergoing a series of tests at Mumbai's Saifee Hospital pic.twitter.com/bezQY0Q9rt— ANI (@ANI_news) February 28, 2017
दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.
उपचारांचा खर्च द्या
शोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगाविला होता.