लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली होती. काही आमदार शरद पवारांची भेट घेत आहेत. काही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कधी एन्ट्री मिळते याची वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणूक पुढील दीड महिन्यात जाहीर होणार आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण येती विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी गावागावात सभा घेत असतानाच सोळंके यांनी ही घोषणा केली आहे. सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.
राजकीय निवृत्ती जाहीर करताना आपला वारसदारही त्यांनी जाहीर केला आहे. पुतण्या जयसिंह सोळंके याच्या नावाची घोषणा सोळंके यांनी केली आहे. येती विधानसभा निवडणूक जयसिंह लढवणार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश सोळंके यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा जयसिंह हा मुलगा आहे. धारूर पंचायत समितीचे उप सभापती, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. आता अजित पवार याला मान्यता देतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मंत्रिपदाची आस होती, पण...
2019 ला चौथ्यांदा निवडून आल्याने आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतू त्यांना ना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले ना शिंदे सरकारमध्ये. मंत्रिपद न दिल्याने नाराजीतून ठाकरे सरकारमध्ये ते आमदार पदाचा राजीनामा देणार होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा शब्द अजित पवार आणि जयंत पाटलांनी दिला होता. तसेच एक वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष पदही दिले जाणार होते. परंतू, मंत्रिपदाने, कार्याध्यक्षपदाने आणि प्रदेशाध्यक्ष पदाने त्यांना हुलकावणी दिली. आता सोळंके यांनी निवृत्ती जाहीर करून राष्ट्रवादीवर दबावतंत्र तर नाही ना वापरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.