बीड – मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरात ज्वलंत होत चालला असून त्याचा फटका राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु सरकारने आश्वासन न पाळल्याने जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले. जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी केली.
मराठा आरक्षणासाठी आमदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी सातत्याने आंदोलकांकडून होत होती. त्यात बीडच्या गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची धग आता राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे. माजलगाव इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी दगडफेक केली तसेच वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे मराठा आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण मिळाले आहे.
आमदार लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण पवार हे गेवराईतील भाजपाचे आमदार आहेत.
...तर सर्वांनी मिळून राजीनामा देऊ – दिलीप मोहिते पाटील
गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालखंडात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी प्रशासक आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आमदार, खासदार ही पदेच शिल्लक आहेत. आज लोकांचे प्रश्न खूप आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही बाहेर पडलो नाही तर लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नका असं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा समाजाला केले.
त्याचसोबत मला सगळ्याच समाजाचे प्रश्न सरकारी दरबारी मांडायचे आहेत. सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडावं हे आम्ही केले पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी काही भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सर्व मराठा समाजाच्या आमदारांनी एकत्रित आवाज उठवून सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू. नाही दिले तर सर्वांनी राजीनामा देऊ. १-२ आमदारांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. सर्वपक्षीय सर्व आमदारांनी भूमिका घेतली तर सरकारला कायदा करणे भाग पडणार आहे. सगळे एकत्र येऊ आणि समाजासाठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊ असंही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलं आहे.