रत्नागिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला ठेवलेल्या एका स्टेटसनं अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात पाऊल उचलल्यानंतर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेदेखील भाऊ उदय सामंत यांच्यासोबत राजकारणात सक्रीय झाले. परंतु त्यांनी ठेवलेल्या स्टेटसने एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे.
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला. त्यामुळे किरण सामंत हे ठाकरे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली. किरण सामंत हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढवण्यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यातूनच किरण सामंत यांनी हे संकेत दिले असावे असं बोलले जात आहे.
याबाबत किरण सामंत म्हणाले की, मी हे स्टेटस ठेवले होते, त्याला काही कारणे होती,त्याबाबत मी योग्य वेळी बोलेन, परंतु मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतले. या स्टेटसवर जो भी होगा देखा जायेगा असं लिहिलं होते ते १०० टक्के, सगळ्या गोष्टीला माझी तयारी होती. फक्त उदयच्या करिअरच्या दृष्टीकोनातून मी ते मागे घेतले. माझ्यामुळे उदयचे करिअर बाद होऊ नये, खराब होऊ नये त्यासाठी मी ते स्टेटस मागे घेतले असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत जे कोणी स्पष्ट बोलण्याचा आव आणतात, लोकांना तणतणू दाखवतात, स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून. असे जे कोणी आहेत. त्यांच्या नो बॉलला मी फ्रि हीट देणारच असा इशाराही अप्रत्यक्षपणे किरण सामंत यांनी त्यांच्या विरोधकांना दिला आहे.
कोण आहेत किरण सामंत?
किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर किरण सामंत यांची सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली होती. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आलेत त्यामागे किरण सामंत यांचाही मोठा वाटा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात ते सक्रीय आहेत. किरण सामंत हे व्यावसायिक आहेत. आजपर्यंत त्यांनी कुठलेही राजकीय पद घेतले नव्हते परंतु शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर ते कोकणातील सिंधुरत्न योजनेचे सदस्य बनले. किरण सामंत हे उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत. ते राजकारणात फ्रंटला नसले तरी पडद्यामागून सूत्रे त्यांच्या हातात असतात. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, अडलेल्या लोकांची कामे करणे यातून ते सतत कार्यरत असतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथं त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.