Big Breaking: अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा; विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 06:35 PM2019-09-27T18:35:57+5:302019-09-27T18:54:14+5:30
अजित पवार हे आज शरद पवार यांच्या ईडीविरोधातील भुमिकेवेळीही कुठेच दिसून आले नाहीत.
मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अजित पवारांचेही नाव आहे. आजच्या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
अजित पवार हे आज शरद पवार यांच्या ईडीविरोधातील भुमिकेवेळीही कुठेच दिसून आले नाहीत. यावरून चर्चा झडू लागल्यानंतर मुंडे यांनी ते पुण्यात असल्याचे सांगितले होते. तसेच ट्रॅफिकमुळे ते येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. कारण गुलदस्त्यात आहे. राजीनामा देण्यासाठी अजित पवार विधानसभाध्यक्षांच्या दालनात गेले होते. मात्र, विधानसभाध्यक्षांच्या विधिमंडळ कार्यालयात त्यांनी हरिभाऊ बागडे नसल्याने त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. तसेच बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी 5.40 मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. यानंतर त्यांचा मोबाईल बंद आहे.
अजित पवार यांचा तडकाफडकी राजीनामा
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2019
https://t.co/CbvSFUjpi9
शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार होते. मात्र पवारांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते अशी विनंती पोलिसांनी शरद पवारांनी केली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या विनंतीला मान देत ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पुण्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाची पाहणा करण्यासाठी तात्काळ पुण्याला रवाना होत असल्याचे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले.
बागडेंनी काय सांगितले?
अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी फोन केला होता. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. फोनवर हरीभाऊ बागडेंनी अजित पवारांना राजीनाम्याचे कारण विचारले होते. मात्र, त्यांनी आधी राजीनामा स्वीकारा नंतर कारण सांगतो असे म्हटले होते.