ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १५ : नाना-नानी पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाला घोटभर पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राकेश राजेश चौधरी (वय १५ रा. लोधी गल्ली सोलापूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश हा येथील वसंतराव नाईक शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने तो सात रस्ता परिसरात असणार्या महापालिकेच्या नाना-नानी पार्कमध्ये गेला होता. पार्कमध्ये सर्व मित्र क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळून तहान लागल्याने राकेश पार्कमध्ये असलेल्या बोअरजवळ पाणी पिण्यासाठी गेला होता. पाणी पिऊन परत जात असताना तेथे असलेल्या विद्युत बोर्डजवळ खुली विद्यूतप्रवाह सुरू असलेल्या वायरला हात लागला. खुल्या वायरमधून हाय होल्टेजचे विद्युत प्रवाह सुरू असल्याने राकेशचा हात लागताच तो वायरला चिटकला. त्यानंतर काही वेळेत तो खाली जमिनीवर पडला. त्याला बेशुध्द अवस्थेत उचलून तत्काळ आई सुशा चौधरी यांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. बालाजी गुद्दे यांनी सांगितले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मृत राकेशचे वडिल बेरोजगार असून आई विडी कारखान्यात विड्या ओळण्याचे काम करून संसाराचा गाडा चालवत होती. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. राकेशच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
धक्कादायक - पाण्यासाठी मुलाने गमावला जीव
By admin | Published: May 15, 2016 8:21 PM