नवी दिल्ली - यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालचा चित्ररथाचा प्रस्तावही नाकारला गेला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात एकूण 22 चित्ररथ सहभागी होणार आहेत. दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळ्यामध्ये भारताची संरक्षण दले शस्त्रास्त्रांसह शक्तिप्रदर्शन करतात. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ संचलनामध्ये सहभाग घेत आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन घडवत असतात. मात्र यावर्षी चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेल्याने प्रजासत्ताक दिनातील संचनात महाराष्ट्र दिसणार नाही. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात चित्ररथ पाठवण्यासाठी देशातील राज्यांना रोटेशन पद्धतीने संधी मिळत असते. मात्र यावर्षी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नामंजूर केला आहे.
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र नंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल आला होता. पुढे 1993/94/95 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. 2015 मध्ये पंढरीची वारी ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावले होते.