मुंबई : एकीकडे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये कोरोना आटोक्यात आला असताना राज्याची आकडेवारी मात्र धडकी भरवणारी आहे. राज्यात आज 17,433 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 292 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूण मृत्यूंचा आकडाही धडकी भरवणारा आहे. या आकड्याने 25000 चा टप्पा पार केला असून आजच्या मृत्यूंमुळे एकूण आकडा 25,195 वर गेला आहे. तर दिलासादेणारा आकडा म्हणजे आज 13959 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात सध्या 2,01,703 रुग्ण उपचार घेत असून 5,98,496 रुग्ण बरे झाले आहेत. आजपपर्यंत 4284000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 825739 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यातील होम क्वारंटाईन लोकांचाही आकडा धक्कादायक आहे. राज्यात 1404213 लोक होम क्वारंटाईन आहेत. यामध्ये रुग्णांचे नातेवाईक, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक आहेत. तर 36785 लोक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहेत.