- नासीर शेख
खेट्री (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतीबंधक लसीच्या सात कुप्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आला आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात ५ फेब्रुवारीपासून कोविड १९ कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ५ फेब्रुवारीपासून दररोज किती लस देण्यात आल्या याची नोंद घेऊन लस कोविड कक्षात ठेवल्या जात होत्या. ११ फेब्रुवारी रोजी पर्यंत सर्व व्यवस्थित होते. परंतु १२ फेब्रुवारी रोजी ७ कुप्या गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. सदर प्रकार उघडकीस आल्याच्या चार दिवसानंतर मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजीच्या रात्री चान्नी पोलिसात तक्रार देण्यात आली. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे मात्र ग्रामीण रुग्णालयाचा पाडलेल्या कारभारामुळे हा प्रकार घडला आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
कोरोना लसीच्या सात कुप्या चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. त्याच दिवशी पोलिसात तक्रार देणे अपेक्षित होते. परंतु सदर प्रकरण राजकीय स्तरावर दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर मंगळवारी रात्री उशिरा कोरोना लस गहाळ झाल्याबाबतची तक्रार चान्नी पोलिसात देण्यात आली
कोविड कक्षातून कोरोना लसीच्या सात कुप्या गहाळ झाल्याचा प्रकार १३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. त्याबाबत चौकशी केली असता लसीच्या सात कुप्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी रात्री चान्नी पोलिसात तक्रार दिली आहे.
- डॉ. स्वप्निल माहोरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चतारी.
कोरोना लसीच्या सात कुप्या गहाळ झाल्याबाबतची तक्रार मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाली असून चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल,
- राहुल वाघ, ठाणेदार, पोलिस स्टेशन, चान्नी