- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्यांच्या बालिकेला उपचारार्थ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोल्यातील बी. पी. ठाकरे रक्तपेढीमधून रक्त मागविण्यात आले, परंतु ते रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे असल्याने आठ वर्षांच्या निष्पाप बालिकेलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले. यासंदर्भात चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी न्याय मागितला आहे.
आठ महिन्यांच्या चिमुकलीवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ताप काही केल्या कमी होत नसल्याने डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. त्यानंतर या चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे सांगितले. यासाठी पांढऱ्या रक्ताची आवश्यकता असून, ते तिला देणे गरजेचे आहे. अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आणण्याचा सल्ला बालिकेच्या पित्याला डॉक्टरांनी दिला. ठरल्याप्रमाणे संकलित केलेले रक्त आठ महिन्यांच्या चिमुकलीला देण्यात आले. परंतु काही केल्या तिचा ताप व पेशी वाढत नव्हत्या. त्यामुळे बालिकेला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने बालिकेची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगितले. तपासणीअंती तिचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आला. न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
आई-वडील निगेटिव्ह
मुलीचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आई-वडिलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी आली, ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या दिशेने शोध घेतला असता एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त चढविल्याने तीही संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले.
संक्रमित रक्त असल्याची रक्तपेढीची कबुली
बालिकेला दिलेले रक्त एका संक्रमित व्यक्तीचे असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. तेच रक्त या चिमुकलीला देण्यात आले आहे, असा कबुली जबाब रक्त पेढीकडून देण्यात आला आहे. रक्तपेढीकडून झालेल्या अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे.
कुठल्याही संक्रमित आजाराचे रक्त इतर रुग्णांना चढविता येत नाही, असे झाले असेल, तर ही अक्षम्य चूक आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून या रक्तपेढीवर कठोर कारवाई करण्यात येईल
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला
बालिकेच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने तिला ते रक्त देणे आवश्यक होते. परंतु आमच्याकडे अधिकृत रक्तपेढीतून आलेले रक्त संपूर्ण तपासण्या केलेले रक्त असल्याचे आम्ही गृहित धरतो. नातेवाईकांनी आणलेले रक्त आम्ही चढविले. ते पॉझिटीव्ह असल्याचे आम्हास माहीत नव्हते.
-डॉ. प्रशांत अवघाते, उपचार करणारे डॉक्टर, मूर्तिजापूर.
रक्तदात्यांकडून रक्त घेतल्यानंतर त्या रक्ताच्या किमान पाच तपासण्या केल्या जातात. या बाळाला ज्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले तेव्हा तो निगेटिव्ह होता. ‘विंडों पिरियड’ दरम्यान हा प्रकार घडला. बाळ पॉझिटिव्ह आले, तेव्हा या रक्तदात्याची पुन्हा तपासणी केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला. हेच रक्त त्या बाळाला देण्यात आले हे निश्चित.
-डॉ. पांडुरंग तोष्णीवाल, रक्त संक्रमण अधिकारी, ठाकरे रक्तपेढी अकोला.