पुणे : पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यु हा आत्महत्या किंवा त्याचा नैसर्गिक मृत्यू असला तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांच्या कार्यपद्धतीविरुद्ध टीकेची झोड उठविली जाते. आरोपी पोलीस कोठडीत असताना आजारपणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून ते टाळण्यासाठी सीआयडीने राज्यभरातील सर्व पोलीस प्रमुखांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
'नॅशनल क्राईम रेक्रार्ड ब्युरो' च्या नोंदीनुसार २०१८ मध्ये महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील एकूण मृत्युपैकी ५ मृत्यू आजारपणामुळे झाले होते. तर, आत्महत्येमुळे एकाचा तर एकाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. पोलीस कोठडी घेतलेली नसतानाही पोलिसांच्या लॉकअपमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोपीला अटक करताना पंचनाम्यात आरोपीच्या बाह्य अंग, शरीरावरील जखमांचा तपशील नमूद करावा. वैद्यकीयदृष्ट्या फीट असेल तरच पोलीस कोठडी घ्यावी. कोठडीत ठेवण्यापूर्वी आरोपीच्या अंगझडतीत त्याच्याकडे हत्यार, विषारी पदार्थ, दोरी, ब्लेड, काडी पेटी, चाकू यासारख्या वस्तू बारकाईने शोधाव्यात. तपास पूर्ण झाला असल्यास पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यास अटक आरोपीचे रिमांड घेणे टाळावे. जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर विनाकारण कोठडीत न ठेवता जामीनावर मुक्त करावे. नागरिकांनी आरोपीला मारहाण केल्यानंतर लोक आरोपीला पोलीस ठाण्यात हजर करतात. अशा प्रसंगी आरोपीला तात्काळ रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करावे. आरोपी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय कोठडी घ्यावी. पोलीस कोठडीतील मृत्यु या विषयाबाबत पोलिसांची संवेदनक्षमता विकसित करण्यासाठी किमान ३ ते ४ वर्षाच्या अंतराने पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे.
मागील काही वर्षात राज्यात पोलीस कोठडीतील मृत्युंचे प्रामुख्याने ३ प्रकार आढळून आले आहेत. १) आरोपीचा आजारपणामुळे मृत्यू २) आरोपीने आत्महत्या केल्यामुळे मृत्यू३) आरोपीचा संशयास्पद मृत्यू
आजारपणामुळे पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी दर ४८ तासांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी. आरोपी आजारी असल्यास वेळेवर औषधोपचार केल्यास आरोपी ज्या कोठडीत असेल तेथील सहआरोपी पोलिसांविरुद्ध तक्रार करणार नाहीत.तसेच पोलिसांना हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागणार नाही.
आरोपीने शौचालयामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. पहाऱ्यावरील अंमलदारांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास हा प्रकार थांबविता येणे शक्य आहे.
आरोपीचा संशयास्पद मृत्यु झाल्यास मारहाणीचे आरोप होतात. मृत्यु झालेल्या आरोपीच्या अंगावरील जखमांच्या खुणा जरी अटक करण्यापूर्वीच्या असल्या तरी त्याला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यु झाल्याचा आरोप होतो. पोलीस कोठडीतील आरोपीस मारहाण करु नये याबाबत अनेक परिपत्रकांद्वारे सूचित करण्यात आले असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अटक करताना त्याच्या अंगावर प्राणघातक जखमा आहेत याची तपासणी करावी, अशा अनेक सूचना सीआयडीने दिल्या आहेत.