सोलापूर : जनजागृती, प्रचार व प्रसाराअभावी ग्राहकांपर्यंत महावितरणच्या वीज ग्राहक दिनाची माहितीच पोहोचली नाही़ त्यामुळे महिन्याच्या पहिल्या बुधवारी झालेल्या महावितरणच्या ग्राहकदिनी फक्त आठच तक्रारी दाखल झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली़ एवढेच नव्हे तर बहुतांश अधिकाºयांसह ग्राहकांना या वीज ग्राहक दिनाची माहितीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण करणे व वीज ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत वीज ग्राहक दिनाचे आयोजन करण्याचा आदेश महावितरणच्या बारामती परिमंडलाचे अधीक्षक अभियंता पावडे यांनी दिले होते़ वीज ग्राहक दिनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्राहकांच्या समस्येचे निराकरण करण्याच्याही सक्त सूचना पावडे यांनी दिल्या होत्या़ मात्र महावितरणच्या सोलापूर विभागातील बहुतांश अधिकाºयांसह ग्राहकांना या दिनाची कल्पनाच नव्हती़ त्यामुळे फक्त बोटांवर मोजण्याइतक्याच तक्रारी आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
सोलापूर सर्कल विभागात (उत्तर व दक्षिण विभाग) दुपारी एक वाजेपर्यंत वीज ग्राहक दिनच झाला नसल्याची माहिती समोर आली़ एवढेच नव्हे तर वीज ग्राहक दिन असल्याबाबतची जनजागृती, प्रचार व प्रसार न झाल्यामुळे सोलापूर सर्कल कार्यालयात एकच तक्रार आल्याचे सांगण्यात आले़ शिवाय अकलूज २, पंढरपूर ३ आणि बार्शीत १ तक्रार दाखल झाल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली़
अन् ग्राहक सेवांची माहिती मिळालीच नाही...- वीज ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीज बिल दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी दाखल करून घेण्यात येणार होते़ दरम्यान, दाखल झालेल्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र एकही तक्रार दाखल न झाल्याने पुढे कार्यवाही करण्याचा प्रश्नच उपस्थित राहिला नाही़ या ग्राहक दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजनांसह ग्राहक सेवांची माहितीसुद्धा यावेळी देण्यात येणार होती. मात्र अधिकाºयांनाच वीज ग्राहक दिनाची माहिती नसल्याने तीही माहिती मिळालीच नाही़
शहर कार्यालयातही दाखल झाली नाही तक्रार- महावितरणच्या जुनी मिल कंपाउंड येथे असलेल्या शहर अभियंता कार्यालयात वीज ग्राहक दिनानिमित्त अभियंता प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह अन्य पाच ते सहा अधिकारी सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित होते़ मात्र शहर कार्यालयात एकही तक्रार आली नसल्याची माहिती प्रसन्न कुलकर्णी यांनी दिली़
महावितरणच्या वीज ग्राहक दिनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत़ पुढील वीज ग्राहक दिनादिवशी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात जनजागृती, प्रचार व प्रसारासाठी डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांना दिनाची माहिती व्हावी, यादृष्टीने सोशल मीडियाचाही आधार घेण्यात येणार आहे.- ज्ञानदेव पडळकरअधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूऱ