अरुण बारसकर
सोलापूर: दुष्काळामुळे जनावरांची विक्री झाल्याचे परिणाम आता दिसू लागले असून, दूध संकलन वाढीच्या पृष्ठ काळात दूध संकलनात मोठी घट होत आहे. पुणे विभागात नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रति दिन एक कोटी ३३ लाख लिटर तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रति दिन एक कोटी ११ लाख लिटर संकलन झाले. दूध वाढीच्या कालावधीत संकलनात तब्बल २२ लाख लिटर इतकी मोठी घट झाल्याने खरेदी दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे.
मागील वर्षी पाऊस अत्यल्प पडल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा पुणे, सातारा व सांगली जिल्ह्याच्या काही भागाला मोठा फटका बसला होता. जनावरांना वैरण व पाण्याची गैरसोय झाल्याने शेतकºयांना जनावरे विकावी लागली. यामुळे जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. अशातच आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्हा तसेच सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांच्या काही भागाला महापुराने धोका पोहोचला आहे. यामुळेही जनावरांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. जनावरांची संख्या कमी झाल्याचा परिणाम आता दूध संकलनावर झाल्याचे दिसू लागले आहे.
मागील वर्षी सप्टेंबर, आॅक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांतील दूध संकलनाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता यावर्षी तब्बल २२ लाख लिटर दूध संकलन घटल्याचे दिसत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे विभागाचे दूध संकलन प्रति दिन एक कोटी ३३ लाख लिटर इतके होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रति दिन एक कोटी ११ लाख लिटर दूध संकलन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आॅक्टोबर ते जानेवारी हा दूध वाढीसाठी पृष्ठकाळ समजला जातो. या कालावधीत संकलन वाढण्याऐवजी जवळपास दररोज २२ लाख लिटर घटले आहे. सप्टेंबर महिन्यात दूध खरेदी दर २७ रुपयांवरुन ३० रुपये इतका झाला होता. तो आॅक्टोबर महिन्यात पुन्हा २७ रुपयांवर आला होता. तो नोव्हेंबर महिन्यात वाढत एक डिसेंबरपासून २९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावडरसाठी पुरेसे दूध मिळत नाही
- - २०१८ मध्ये पुणे विभागात सप्टेंबर महिन्यात १२४ लाख, आॅक्टोबर महिन्यात १२९ लाख तर नोव्हेंबर महिन्यात १३३ लाख लिटर दूध संकलन झाले होते. २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्यात ९९ लाख, आॅक्टोबर महिन्यात १११ लाख तर नोव्हेंबर महिन्यात १११ लाख ६७ हजार दूध संकलन झाले आहे.
- - पुणे विभागातील गोळा झालेले दूध ३५ ते ३६ लाख लिटर पॅक पिशवीसाठी, एवढेच दूध ठोक विक्रीसाठी, २३ लाख लिटर रूपांतरासाठी तर १३-१४ लाख लिटर दूध दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. मात्र रूपांतरासाठी(पावडर तयार करण्यासाठी) दूध आवश्यक तेवढे उपलब्ध होत नसल्याने दूध खरेदी दरात वाढ होते आहे. पर्यायाने पावडरच्या दरातही वाढ होऊ लागली आहे.
सोलापूर पट्ट्याला दुष्काळाचा फटका तर कोल्हापूर जिल्हा तसेच भीमा, कोयना व कृष्णा खोºयातील नद्यांना आलेल्या महापुराचा फटका जनावरांना बसला आहे. पाणी व वैरण नसल्याने जनावरांच्या संख्येत घट झाली. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दूध खरेदी दरात वरचेवर वाढ होत आहे. दूध पावडरच्या दरातही वाढ होत आहे.- प्रशांत मोहोडविभागीय दुग्ध विकास अधिकारी