ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - केंद्र सरकारने काळा पैसा हद्दपार करण्यासाठी चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जरी हा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी घेण्यात आला असला तरी यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर तितकेच वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
'मुंबई मिरर' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, हॉस्पिटलने चलनातून रद्द केलेल्या या नोटा स्वीकारण्यास नकार दिला म्हणून उपचारांअभावी एका नवजात मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. गोवंडीमधील ही दुर्दैवी घटना आहे. गोवंडी येथील जीवन ज्योत हॉस्पिटल आणि नर्सिंग होमने या नवजात मुलावर उपचार करण्यास नकार दिला आहे. कारण मुलाच्या पालकांकडे उपचारांसाठीची डिपोझिट करण्याच्या रक्कमेत 500 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या.
या मुलावर उपचार होणे फार गरजेचं होते, मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने मुलावर योग्य वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर मुलाचे वडील जगदीश शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांची ही तक्रार पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलकडेदेखील पाठवली आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे स्पष्ट आदेश सरकारकडून देण्यात आलेले असतानाही बरेच हॉस्पिटलमध्ये रद्द केलेल्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.