सोलापूर : आपल्या मित्रांना मोबाईलवरून माहिती देऊन आकाश आनंत जाधव (वय २७, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) या तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
आकाश जाधव हा कारवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. तो रविवारी एका मित्राच्या वाढदिवसाला गेला होता. वाढदिवस झाल्यानंतर तो रामवाडी परिसरात आला. अज्ञात कारणावरून तो तणावात होता, त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. विषही प्राशन केले होते. तो अशा अवस्थेत मोदी येथील रेल्वे रुळाजवळ बसला होता.
आपल्या जवळच्या मित्रांना त्याने मोबाईलवर फोन करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली होती. मित्रांनी त्याला असे करू नको, तू कुठे आहेस, अशी विचारणा केली. तो मोदी येथील रेल्वे रुळाजवळ असल्याचे कळताच मित्रांनी तेथे धाव घेतली.
मित्र येत असल्याचे पाहून तो तेथून पळून गेला, तो पुढे लक्ष्मी चाळीच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळाजवळ जाऊन झोपला. रेल्वे मालगाडी अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला, अशी माहिती एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली. याची लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
आकाश याला आई, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे.
व्हिडीओ व पोस्ट्स गाजल्या..- आकाश जाधव हा सोशल मीडियावर सक्रिय होता, त्याने अनेक कॉमेडी टिकटॉक व्हिडीओ तयार केले होते. सोशल मीडियावर त्याचे असंख्य फॉलोअर्स होते. तो सातत्याने नवनवीन व्हिडीओ व फोटो टाकून सर्वांचे लक्ष वेधत होता. त्याला मित्र परिवारही मोठा असल्याने त्याचे व्हिडीओ व पोस्ट नेहमी चर्चेत राहत होते. हिट झाला टाईमपास..., खूप गाजली दुनियादारी..., आता माझी बारी... लयभारी. अशा प्रकारची अनेक पोस्ट तो फेसबुकवर टाकत होता. गेल्या काही दिवसात त्याने जीवनाला कंटाळलेल्या पोस्टही सोशल मीडियावर टाकल्या होत्या. पोस्टमध्ये अनेक डायलॉग म्हणून स्वत:च्या भावना व्यक्त केल्या होत्या. मित्रांमध्ये तो मनमिळावू स्वभावाचा होता, त्याच्या या कृत्याने सर्वत्र हळवळ व्यक्त केली जात आहे. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.