सोमनाथ खताळ
बीड : कोरोना लसीकरण सुरू करण्यापूर्वी ड्राय रन घेतला. यात केवळ नियोजनाचा देखावा दिसला. प्रत्यक्षात ढिसाळ कारभार असल्याचे शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालयात दिसले. लस घेतलेल्या आशा, अंगणवाडीताईंना निरीक्षण कक्षात चक्क जमिनीवर बसविण्यात आले. तसेच येथे कोरोनाच्या कसल्याच नियमांचे पालन केले नसल्याचेही दिसले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता. यात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यात आले होते. असेच नियोजन प्रत्यक्ष लसीकरणात होणार होते. परंतु शुक्रवारी आढावा घेतला असता वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली.
दुपारनंतर मिळाल्या खुर्च्या‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना संपर्क केला. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीत्ते यांना भेट देण्यास सांगितले. दुपारनंतर परिस्थिती बदललेली दिसली. खाली बसणाऱ्यांना खुर्च्या तर निरीक्षण कक्षांची संख्याही वाढविण्यात आली.
डॉक्टरांना खुर्च्या, ‘आशां’ना दुजाभाव का?कोरोनाकाळात डॉक्टर, परिचारिकांनी जेवढा जीव धोक्यात घालून काम केले, तसेच आशाताई, अंगणवाडी सेविका यांनीही सर्वेक्षण, नोंदणी अशी विविध कामे केलेली आहेत. त्या सुद्धा काेरोना योद्धा आहेत. परंतु लसीकरण केंद्रात दुजाभाव केल्याचे दिसले. डॉक्टरांना बसायला खुर्च्या दिल्या जातात, परंतु आशांना जमिनीवर बसविण्यात आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.