अनेकजण त्यांच्या कामानिमित्त शहरात वास्तव्यास होते. मात्र, बघता बघता कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, हातात पुरेसा पैसा नाही, जेवायला अन्न नाही. अशात अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागला. शेवटी अनेकांनी पुन्हा त्यांच्या गावच्या घरचा रस्ता धरला. मग मिळेल तो पर्याय वापरत अनेकजण कसे बसे त्यांच्या मुळगावी पोहोचले. गावी जाऊन तरी सुरक्षित राहाता येईल आणि हाल होणार नाहीत, याच आशेने अनेकजण गावी गेले. मात्र, त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली. अनेकांना गावच्या सीमेवरच गावकऱ्यांनी रोखले. त्यांना गावात प्रवेश देण्यास सक्त मनाई करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक तरुण खेड लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत कामाला होता. सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 14 मे रोजी त्याने आपल्या मुळगावी केळशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या गावी बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यास मनाई असल्याचे त्याला माहिती नव्हते. जेव्हा तो गावी पोहचला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला गावात येण्यात मनाई केली, तसेच दुसरीकडे जाण्यास सांगितले. या तरूणाने रितसर स्वतःची तपासणी केली होती. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्याला 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे सांगण्यात आले होते.
बाहेरच्या व्यक्तीला गावात घ्यायचे नाही हा नियम झाल्यानेच आम्ही त्याला घरी ठेवले नाही, असं त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर नातेवाईकांनीच पुढाकार घेत त्याला शेतात एका छोट्याशा रिक्षा टेम्पोत राहण्याची सोय केली. या ठिकाणी ना लाईट, ना पाणी, ना टॉयलेट, ना बाथरूम अशातच त्याला दिवस काढावे लागत आहे. मात्र, हा प्रकार समोर येताच अनेक लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. माणुसकीच उरलेली नाही असा राग व्यक्त होताना दिसत आहे.