ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुख्यमंत्रीपदाची आतूरतेने वाट बघणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांना कुडाळमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे वैभव नाईक यांनी राणे यांना धूळ चारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देत नारायण राणे यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्टींशी चर्चा झाल्यावर नारायण राणे यांचे बंड शमले होते. यानंतर राणे यांची काँग्रेसच्या प्रचार समिती प्रमुख पदावर वर्णी लागली होती. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले नारायण राणे यांना यंदा पराभवाचा धक्का बसला आहे. कुडाळमधून राणे तब्बल १० हजार मतांनी पराभूत झाले आहेत. तर कणकवली येथून त्यांचे पूत्र निलेश राणे हे विजयी झाल्याने राणे यांची अब्रू राखली गेली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतही राणे यांचे मोठे सुपूत्र नितेश राणे यांचा पराभव झाला होता. लागोपाठ दोन पराभवांमुळे सिंधुदुर्ग पट्ट्यातील राणेंचे वर्चस्व संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे.
राणेंपाठोपाठ गणेश नाईक यांचा पराभवही धक्कादायक ठरला आहे. नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असे समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झाले होते. लोकसभा, विधानसभा, महापालिका या तिन्ही ठिकाणी नाईक कुटुंबाचे वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांनाही धक्का बसला आहे. बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या मंदा म्हात्रे यांनी अवघ्या ४५० मतांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. यवतमाळमधील राळेगाव येथे काँग्रेस नेते वसंत पुरके यांचा पराभव झाला असून त्यांना भाजपचे अशोक उईके यांनी पराभूत केले आहे. राणे, नाईक यांचा पराभव झाला असला तरी पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे.