ऑनलाइन लोकमत
पैठण, दि. ६ - जायकवाडी धरणातून पाणी सोडा या मागणीसाठी ३ तारखेपासून पासून सुरू असलेले शेतक-यांचे आंदोलन काल आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतक-यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात केलेले 'शोले' स्टाईल आंदोलन खूप गाजले. शुक्रवारी शेतक-यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने जयाजीराव सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पासून पैठण येथे आंदोलन सुरू झाले. या शेतक-यांना पोलिसांनी स्थानबध्द करून रात्री ८ च्या दरम्यान मुक्त केले. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी शेतकरी पावन गणपती मंदिर येथे जमा झाले, मात्र तेथे पुन्हा पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान हे शेतकरी पुन्हा तहसिल कार्यालयात जमा झाले, तेथे त्यांनी प्रशासनाच्या खुलाशाची वाट पाहिली पण निराशा पदरी पडल्याने शेवटी दुपारी ३च्या दरम्यान तहसिल कार्यालयाच्या प्रांगणा बाहेर बेमुदत उपोषण करण्यास प्रारंभ केला. जोपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहिल असे जयाजी सुर्यवंशी यांच्यासह शेतकर्यांनी भूमिका घेतली शेवटी तहसीलदार किशोर देशमुख भाजपा चे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांच्याशी दि ५ रोजी आंदोलन करणा-या शेतक-यांचे संवाद साधला व त्यानंतर आंदोलक शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले