मसलगा (जि. लातूर) : दुष्काळी परिस्थितीतही प्रशासनाकडून कामे उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने सोमवारी सकाळी पानचिंचोली येथील २५ ते ३० मजुरांनी जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. एका मजुराने तर थेट जलकुंभाच्या खाली अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. जमावाने त्यास रोखल्याने अनर्थ टळला. दुष्काळी परिस्थितीमुळे निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी मजुरांनी १७ नोव्हेंबरला बाजार चौकात लाक्षणिक उपोषण केले होते. निलंग्याच्या विस्तार अधिकाऱ्यांनी तत्काळ काम उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. १५ दिवस उलटले, तरी प्रशासनाकडून काम उपलब्ध होत नसल्याने, सोमवारी पानचिंचोलीतील विकास हणमंते, गणेश हणमंते, राजेंद्र बंडगर, दत्तू कांबळे, अंकुश जाधव, बाबु हणमंते, अनिल हणमंते, सैलानी शेख, वाघंबर सरवदे, इस्माईल शेख आदी मजुरांनी गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.प्रशासनाच्या हलगर्जीच्या निषेधार्थ गावातील लक्ष्मणराजे भोसले या मजुराने जलकुंभाच्या खाली पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने त्यास वेळीच रोखले. (प्रतिनिधी)तीन दिवसांत काम मिळणारनिलंग्याचे नायब तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी कुलकर्णी घटनेनंतर गावात आले. त्यांनी तीन दिवसांत काम उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी दुपारी आंदोलन मागे घेतले.कागदपत्रांचा खेळ कामाची मागणी केली असता प्रशासनाकडून आॅगस्टमध्ये अर्ज भरून घेण्यात आले. मात्र हाताला काम उपलब्ध करुन दिले नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागल्याचे नवनाथ हणमंते यांनी सांगितले. ग्रामपंचायत कागदपत्रांचा खेळ करत असून काम उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप लक्ष्मणराजे भोसले यांनी केला.
बेरोजगार मजुरांचे शोले स्टाईल आंदोलन
By admin | Published: December 01, 2015 12:45 AM