सुशांत मोरे,मुंबई- मुंबई उपनगरीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात झोपड्यांसह अन्य अनधिकृत बांधकामांचा विळखा बसलेला आहे. त्यामुळे रेल्वेला विकास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतानाच ट्रॅकवर विविध बिघाडांचाही सामना करावा लागतो. यावर कारवाई करण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी दिली. हे चित्रीकरण राज्य सरकार आणि त्या-त्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येईल. त्यानंतर अतिक्रमणांवर कारवाई करण्याची विनंती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन हे मुंबई भेटीवर आले असून, त्यांनी मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेच्या कामांचा तसेच तांत्रिक कामांचा आढावा घेतला. सीएसटी येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई उपनगराच्या दोन्ही रेल्वे मार्गांवर ट्रॅकजवळच मोठ्या प्रमाणात झोपड्या व अन्य अनधिकृत बांधकामे आहेत. यातील मध्य रेल्वेच्या हद्दीतच जवळपास १८ हजार तर पश्चिम रेल्वे मार्गावरही तितकीच अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांमुळे विकासकामात अडथळा येतो. रुळांजवळील झोपड्या व वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात कचरा व सांडपाणीही सोडले जाते. त्यामुळे रुळांखालील खडी व भराव वाहून जातो. त्याचा परिणाम रुळांवर होतो. सातत्याने ट्रेन जात असल्याने आवश्यक असा भार रूळ पेलू शकत नाही आणि त्यामुळे रुळाला तडा जाते. तसेच सिग्नल यंत्रणेतील केबल चोरी आणि त्यामुळे होणारे बिघाडही सातत्याने समोर येत आहेत. याची डोकेदुखी होत असल्याने रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>कामांचा आढावारेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी कोकण रेल्वेलाही भेट देत त्यांच्या कामांचा आढावा घेतला. त्या वेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता उपस्थित होते. प्रवाशांची सुरक्षा, सुविधा, ट्रेनचा वक्तशीरपणा, आर्थिक स्थिती तसेच कोकण रेल्वे मार्ग, पोर्टशी जोडणी यासह अन्य कामांची माहिती घेतली. कोकण रेल्वेवरील कामांसाठी वेळोवेळी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांचे शूटिंग चित्रीकरण
By admin | Published: March 07, 2017 5:12 AM