संतोष येलकरअकोला, दि. १३- जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांकडून जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना शौचालय बांधण्यासाठी आग्रही विनवणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २0१७-१८ पर्यंत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सन २0१६-१७ मध्ये ४३ हजार ३६५ कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला शहरात १0 हजार ७00 आणि जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामीण भागात ३२ हजार ६६५ कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आता जिल्हय़ातील रास्त भाव दुकानदारांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गत ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्य व रॉकेलसाठी रास्त भाव दुकानांमध्ये येणार्या शिधापत्रिकाधारकांना येत्या डिसेंबर अखेरपर्यंत शौचालय बांधण्याचा आग्रह रास्त भाव दुकानदारांकडून करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात १ हजार ५२ रास्त भाव दुकाने असून, संबंधित रास्त भाव दुकानदारांकडून शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना शौचालय बांधकामासाठी विनवणी करण्यात येत आहे.-सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ातील रास्त दुकानात येणार्या शौचालय नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानदारांकडून डिसेंबर अखेरपर्यंत शौचालय बांधण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे.-अनिल टाकसाळेजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.
शौचालयासाठी रास्त भाव दुकानदारांची शिधापत्रिकाधारकांना विनवणी!
By admin | Published: October 14, 2016 2:35 AM