मुंबई: मानसिक ताण आहे, एकटेपणा जाणवतोय. मग काय मूड चांगला व्हावा, यासाठी शॉपिंगला जाता? मनात येताच शॉपिंग केले नाही, तर वाढणारा अस्वस्थपणा हा एक मानसिक आजार असू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. अनेकदा केवळ मनात आले, म्हणून खरेदी केली जाते. खरेदी केल्यावर मन शांत होते, पण त्यानंतर काही वेळाने ‘खरेदी का केली?’ असा प्रश्न सतावू लागतो. उगाच पैसे आणि वेळ वाया गेला, अशी भावना मनात निर्माण होते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा शॉपिंगसाठी या व्यक्ती बाहेर पडतात. अशा प्रकारे खरेदी करण्याला वैद्यकीय भाषेत आॅनियनोमॅनिया असे म्हटले जाते. अशा व्यक्तींना खरेदीच्या विचाराला आवर घालणे शक्य होत नाही, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. जी.टी. रुग्णालयात सध्या दोन तरुणींवर उपचार सुरू आहेत. २५ ते ३० वयोगटातील या तरुणी सुखवस्तू कुटुंबातील आहेत. त्या चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतात, पण आपला पगार हा केवळ खरेदीवर खर्च करतात. याला आळा घालण्यासाठी रुग्णालयात आणले गेले. हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचे त्यांच्या कुटुबीयांना पटवून द्यावे लागले. त्या तरुणींवर औषधोपचार सुरू केले, त्यांचे समुपदेशन केले. त्याचबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करावे लागले, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काय कराल... : नैराश्य आले, मानसिक दडपण आले, तर शॉपिंग करण्याचा मोह आवरत नसल्यास त्याचा गांभीर्याने विचार करा. खरेदी करण्याचा विचार आल्यावर त्याला आळा घाला. खरेदी करायला जाऊ नका. या कृतीमुळे तुमच्यात कोणते शारीरिक बदल होतात का? याचे निरीक्षण करा. तुम्ही थोडा वेळ अवस्थ झालात, पण तरीही नियंत्रण करता आले, तर काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, पण अस्वस्थपणा वाढला, तुम्हाला नियंत्रण ठेवता आले नाही, तर नक्कीच मानसोपचार तज्ज्ञाकडे तपासणीसाठी जा.
नैराश्य घालवण्यासाठी शॉपिंग करताय, सावधान!
By admin | Published: January 03, 2016 3:29 AM