विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मॉल आणि ठराविक क्रीडा प्रकारांना परवानगी दिली आहे.राज्यात लॉकडाऊनचा हा सातवा टप्पा असेल. ५ ऑगस्टपासून मॉल उघडण्यास परवानगी असेल. मात्र मॉलमधील रेस्टॉरन्ट, थिएटर व फुडकोर्ट हे बंदच राहतील. मॉल सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. शासकीय कार्यालयांत १५ टक्के व १५ कर्मचारी यामध्ये जी संख्या अधिक असेल त्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. १० कर्मचारी वा १० टक्के कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या उपस्थितीने खासगी कार्यालये सुरू ठेवता येतील. गणेशोत्सव २२ आॅगस्टपासून सुरू होत आहे या काळातही लॉकडाऊन कायम असेल.
आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी नाहीकेंद्र सरकारने आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी दिली आहे ; मात्र राज्य शासनाने ती दिलेली नाही. कोरोनाग्रस्तांचा चार लाखाचा आकडा राज्याने पार केला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम ठेवण्याची भूमिका उद्धव ठाकरे सरकारने घेतली आहे.
क्रीडा प्रकारांना अनुमतीकाही क्रीडा प्रकारांना मात्र अनुमती दिली आहे. त्यात असांघिक (वैयक्तिक) खेळ असतील. गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व आऊटडोर जिमनॅस्टिक यांना परवानगी दिलेली आहे. रेस्टॉरन्ट सुरू करण्याची जोरदार मागणी मालकांनी केली असली तरी ती मान्य झालेली नसल्याने रेस्टॉरन्ट सुरू होण्यास प्रतीक्षाच करावी लागेल. मात्र होम डिलिव्हरीची परवानगी कायम असेल.