मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांना अल्प मुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अलीकडेच हा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार, राज्यातील इच्छुक संस्थांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविले होते. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे प्राप्त झालेले अर्ज व अर्जासोबतची मूळ कागदपत्रे ही पडताळणी समितीमार्फत तपासण्यात आली. तसेच पात्र संस्थेतील पायाभूत सुविधांची भौतिक पडताळणीही तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात आली.
राज्यस्तरीय समितीने विभागीय स्तरीय समितीच्या अहवालांची पडताळणी केली. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारितील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन संस्था सुरू करणे, संलग्नित शैक्षणिक संस्थेत नवीन अभ्यासक्रम राबविणे, अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करणे, अभ्यासक्रम बंद करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, संस्थेच्या व्यवस्थापनाच्या नावात बदल करणे व संस्थेच्या पत्त्यात बदल करणे याबाबतचे प्रस्ताव मंडळामार्फत शासनास सादर केले.
या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी संस्थांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची संलग्नता घेणे आवश्यक आहे. तसेच या शासन निर्णयाद्वारे मंजुरीप्राप्त अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने राबविण्याचे ठरविल्यास अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता घेणे संस्थांवर बंधनकारक राहील.
मंजुरी विनाअनुदान तत्त्वावरअल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना देण्यात येणारी मंजुरी ही कायम विनाअनुदान तत्त्वावर आहे. या अभ्यासक्रमांना शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येणार नसल्याचेही निर्णयात म्हटले आहे.