कल्याण : अुपऱ्या मनुष्यबळाअभावी मालमत्तांना सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा यक्षप्रश्न कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागाला पडला होता. मात्र, आता लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ३४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने दिले होते. यावर कर्मचारी नेमण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.सुरक्षारक्षकांची २६२ पदे मंजूर असून, सध्या १२९ पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका डोंबिवली विभागाला बसत आहे. या विभागासाठी ५५ सुरक्षारक्षक असलेतरी प्रत्यक्षात ४८ जणच कार्यरत आहेत. त्यामुळे येथील महापालिकेच्या बहुतांश मालमत्ता सुरक्षेविना वाऱ्यावर पडल्या आहेत. एकंदरीतच अवाका पाहता येथे ८५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. काहींची नेमणूक डोंबिवलीसाठी करण्यात आली आहे; परंतु त्यांनी कल्याणमधील मुख्यालयात वर्षांनुवर्षे ठाण मांडले आहे. नवीन भरती होणाऱ्या सुरक्षारक्षकांचा कल सर्वसाधारणपणे अग्निशामन दला आणि लिपिक होण्याकडे असतो. तसेच निवृत्त होणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या जागाही रिक्त राहत आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांची नेहमीच वानवा जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे ३४ जण घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु याला मुहूर्त मिळालेला नव्हता. मागील महासभेत सभागृहनेते राजेश मोरे यांनी लवकरच सुरक्षाकर्मचारी तैनात करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. मुदत संपलेल्या सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांची पुन्हा नेमणूक करा, अशी मागणी त्यांनी केली होती. (प्रतिनिधी)>ताण होणार हलकासुरक्षा मंडळाच्या कंत्राटाची मुदत मे महिन्यात संपली आहे. पुन्हा त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांची नेमणूक केली जाईल, अशी माहिती सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांनी दिली.
सुरक्षारक्षकांची लवकरच नियुक्ती
By admin | Published: November 04, 2016 3:30 AM