मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रमही सुरू आहे. मात्र, यातच राज्यात लशींचा तुटवडा होत असल्याची तक्रार राज्यातील ठाकरे सरकारने केंद्राकडे केली आहे. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर 'महावसुली' आघाडी सरकार म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (The shortage of vaccines in the state is a crisis created by the State government says BJP)
या व्हिडिओत उपाध्ये यांनी म्हटले आहे, की "राज्यात निर्माण झालेला कोरोना लशींचा तुडवडा हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट आहे. खरे तर, या सरकारने हिशेब द्यायला हवा, की लसीकरण सुरू झाल्यापासून जे पात्र आहेत, त्यांनाच लशी दिल्या गेल्या, की जे निकशात बसत नव्हते त्यांनाही लशी दिल्या गेल्या. काही खास लोकांना, काही लाडक्या लोकांना लशी दिल्या गेल्यात का? नियम मोडून काही लशी दिल्या गेल्यात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत," असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'
या शिवाय, तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते. गेल्या दोन-तीन महिन्यांत लसिकरण झाल्यापासून लशी नेमक्या कुणाला दिल्या? याचा हिशेब महाराष्ट्र सरकारने द्यायला हवा, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.
"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"
राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.
केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.